बातम्या

नानाची टांग : वांद्रे टू दिल्ली

सकाळ न्यूज नेटवर्क

हो  ना करता करता अखेर आमचे एकमेव नेते व महाराष्ट्राचे तडफदार कारभारी मा. श्री उधोजीसाहेब यांनी दिल्लीकडे कूच केले. दिल्लीला कसे जावे, कोणास भेटावे, यावर आधी दुमत होते. त्यामुळे दिल्लीभेट पुढे पुढे पुढे ढकलली जात होती. अखेर सारे शुभग्रह येकवटले, आणि दिल्ली पर्यटनासाठी मा. साहेब (येकदाचे) मोहीमशीर झाले...

हो  ना करता करता अखेर आमचे एकमेव नेते व महाराष्ट्राचे तडफदार कारभारी मा. श्री उधोजीसाहेब यांनी दिल्लीकडे कूच केले. दिल्लीला कसे जावे, कोणास भेटावे, यावर आधी दुमत होते. त्यामुळे दिल्लीभेट पुढे पुढे पुढे ढकलली जात होती. अखेर सारे शुभग्रह येकवटले, आणि दिल्ली पर्यटनासाठी मा. साहेब (येकदाचे) मोहीमशीर झाले...

दरमजल करीत मा. साहेबांची शिबंदी (खुद्द मा. साहेब समाविष्ट) राजधानीचे वेशीवर पोचली. तेथे राहुट्या ठोकण्यात आल्या. मा. साहेबांनी तेथ थोडी विश्रांती घेतली. प्रवासाचा थोडका शीण कमी होताच मा. साहेबांनी तांतडीने आपल्या सरदारांची बैठक बोलावून तांतडीने दोन सांडणीस्वार दोन दिशांना रवाना केले. येक  सांडणीस्वार ‘७, लोककल्याण मार्ग’ येथ गेला, तर दुजा ‘१०, जनपथ’ येथ पोचता झाला. दोहोंकडे येकच संदेश होता- ‘‘महाराष्ट्रभूषण प्रात:स्मरणीय मा. उधोजीसाहेब दिल्लीस पोहोच जाहले असोन, आपणांस भेटू इच्छितात!’’

‘‘उधोजीभाई अहिंया आव्या छे...पती गयो!’’ ऐसे उद्‌गार ‘७, लोककल्याण मार्ग’ येथून ऐकू आले.

‘‘ओह माय गॉड!’’ ऐसे उद्‌गार ‘१०, जनपथ’ येथून ऐकू आले. 

...दोन्ही उद्‌गारांमध्ये दडलेले संदेश घेवोन सांडणीस्वार वेशीवरील मा. साहेबांच्या शाही राहुटीत परतले. या परतीच्या संदेशांचा नेमका अर्थ काय यावरही दुमत होते. अखेर मऱ्हाटी दौलतीचे सरनोबत व मऱ्हाटी दरबारातील दिलेर शिलेदार मा. संजयाजी राऊतसाहेब यांनी संदेशांची उकल करोन सांगितली. त्यांची मसलत नेहमीप्रमाणे कारगर जाहली. अखेर तिसऱ्या प्रहरी औपचारिक पोशाखादी प्रसाधन करोन मा. साहेब मोहिमेवर निघाले. सरनोबत संजयाजी सोबत होतेच. (या गृहस्थांना दिल्लीची खडानखडा माहिती आहे, अशी महाराष्ट्रातील रयतेची समजूत आहे!! वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीतील टॅक्‍सीवाल्यांमध्ये मा. राऊतसाहेबांच्या चांगल्या ओळखी आहेत, येवढेच!) त्यामुळे पत्ता सांपडण्यास अडचण आली नाही. (परंतु, दिल्लीची खडानखडा माहिती असल्याचे क्रेडिट मात्र सरनोबत संजयाजी यांनी खाल्ले!!) जाव दे, आपल्याला काय करायचे आहे?

‘‘चला, निघू या! शुभास्ते पंथान: संतु...,’’ कुठल्या तरी दिशेला बोट दावून मा. साहेबांनी कूच करण्याची आज्ञा दिली. त्यांनी बोट दाखवले, त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला जायचे आहे, अशी माहिती सरनोबत संजयाजी यांनी लगोलग दिली.

‘‘आधी कुठे जायचं? कुणाकडे?’’ मा. साहेबांनी सवाल केला. हा मात्र शंभर नंबरी सवाल होता. आधी ‘७, लोककल्याण’ला गेले तर ढोकळा खावा लागेल, आणि आधी ‘१०, जनपथ’ गेल्यास नेमके काय खायला मिळेल, हे सांगता येणार नाही, याची कल्पना मा. साहेब यांना देण्यात आली. मा. साहेब संभ्रमात पडले. कुठे आधी जावे? कुठे नंतर?...बराच काळ काही ठरत नव्हते. 

...अखेर नाणे उंच उडवून छापाकाटा करण्याचे ठरले. सरनोबत संजयाजींनी इकडेतिकडे पाहिले. नेमकें आम्ही समोर उभे होतो. त्यांनी आमच्याकडे नाणे मागितले. आम्ही मुकाट्याने काढून दिले. नाण्याची कुठली बाजू ‘छापा’ आणि कुठली ‘काटा’ हेही बराच काळ ठरेना! अखेर बरीच वादावादी झाल्याने मा. उधोजीसाहेबांनी नाणेफेकीला स्थगिती दिली. काहीही काम अनिर्णित राहू लागले की ते पहिले स्थगिती देऊन टाकतात!! त्या धोरणानुसार घडले. पण नाणे सरनोबत संजयाजी यांनी खिश्‍यात टाकल्याने आमचे आर्थिक नुकसान व्हायचे ते झालेच! असो.

अखेर, जो बंगला आधी येईल, त्यात शिरायचे, असा निर्णय घेण्यात आला. 

Web Title: Nanachi tang article political delhi tour

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT